७५ वर्षाच्या माणसाला कुणी अरेतुरे करत नाही..
पण नाना होताच तसा. आपला वाटणारा, अगदी गल्लीतल्या कट्ट्यावर बसून पाठीवर थाप मारून बोलतोय असं वाटणारा..
४८ वर्षांची देदीप्यमान कारकीर्द गाजवूनही 'अहंकाराचा वारा न लागो माझिया चित्ता' म्हणत साधेपणा जपणारा नाना ..
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून कमर्शियल आर्ट शिकणारा, पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग अन् भिंतींवर जाहिराती रंगवणारा नाना..
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हेगारांचे चेहरे स्केच करणारा नाना ..
चार फिल्मफेअर, तीन राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री असे सारे सन्मान गुंडाळून ठेऊन अनवाणी शेतात रमणारा नाना..
'हमीदाबाईची कोठी' असो, 'पुरुष'मधला खलनायक गुलाबराव असो, 'परिंदा', 'अंकुश', 'क्रांतिवीर' असो, की थेट 'नटसम्राट'चा गणपतराव बेलवलकर... या प्रत्येक भूमिका तो अक्षरशः जगला..
आणि तरीही नाना फक्त पडद्यापुरता राहिला नाही..
‘प्रहार’ साठी मराठा लाईट इन्फंट्रीसोबत सैनिकी प्रशिक्षण घेणारा, आणि टेरीटोरियल आर्मीकडून 'कॅप्टन' ही मानद पदवी मिळवणारा ध्येयवेडा नाना.. कशातही झोकून देऊन काम करणं हे त्याच्या रक्तातच होतं.. मग ते अभिनय असो.. युद्ध.. वा समाजसेवा..
१९९९ च्या कारगिल युद्धात असाच दोन महिने सीमेवर जाऊन लढला.. आला तो वीस किलो वजन घटवूनच ..
कुठल्याश्या जाहिरातीत टिंगल उडवणाऱ्या उनाड पोरांच्या पंजा लढवायच्या आव्हानाला "तेरे बस की बात नहीं, बाप को भेज!" असा खणखणीत टोला हाणणारा नाना.. त्याचं ते पडद्यावर वावरणं खरं वाटायचं..
‘देऊळ’ सिनेमात भाऊच्या भूमिकेत नाना किती खरा वाटतो..
"शहरातल्या लोकांना वाटतं गावाने गावासारखंच राहावं... शेणमुतात राबावं.. नाही चालायचं अण्णा.." असं म्हणत ग्रामीण अस्मितेलाही विकासाची आस असते, ही नवी दृष्टी पांढरपेशा शहरी मनाला देणारा नाना...
त्याला उमेदीच्या काळात इतरांनी केलेल्या मदतीची त्याने नेहमीच जाण ठेवली आणि हजार पटींनी परतफेड केली. "देवाने आपल्याला दोनच हात दिलेत कारण त्या ओंजळीत जितकं मावतं तितकं आपल्याला पुरेसं आहे, ओंजळ भरली की खाली सांडून त्याची माती होणारच आहे, त्यामुळे त्या आधीच ते दुसऱ्यांना तुम्ही देऊन टाका" हे तत्त्व तो सांगत राहिला.. जगत राहिला.
त्यातूनच आमटे कुटुंबियांच्या घरातलाच एक होऊन तो राहिला..
पुढे 'नाम फाउंडेशन' उभं केलं.. वास्तविक पाहता सर्व पक्षात, सिनेसंगीत क्षेत्रात, साहित्य वर्तुळात मित्र असलेल्या नानाने मदतीचं आवाहन जरी केलं असतं तरी पैशाचा पाऊस पडला असता.. पण इथेही तेच झोकून देणं..
फटकळ, रांगडा आणि बेदरकार असलेला माणूस इतका हळवं मन कसा काय जपू शकतो हे त्यालाच माहिती.. त्याच्यासोबतच ते गुपित गेलं..
'चला हवा येऊ द्या' मध्ये सागर कारंडेने आपली केलेली नक्कल पाहून लहान मुलासारखा खळखळून हसणारा नि दाद देणारा नाना आता दिसणार नाही..
निखिल वागळे मुलाखत घेत असताना "इथे बैल पण आहेत" असं मिश्किलपणे त्याच्याकडे बघत कोपरखळी मारणारा नाना आता आठवत राहील..
90s च्या पिढीच भावविश्व ज्यांनी घडवलं ते एक एक तारे आता निखळून चाललेत.. आणि ते गेल्यावर त्यांची उणीव भासावी इतपत 'समृद्ध अडगळ' आपण जमा करून ठेवलीच आहे की..
७५व्या वर्षानिमित्त कुणीच त्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा मोठा सोहळा का केला नसेल याची खंत वाटते.. कदाचित त्यानेच नाही म्हटलं असेल.. किंवा आणखी काही.. पण व्हायला हवा होता.. आपले मानबिंदू आपण अभिमानाने मिरवत नाही हे खरंच..
नानाचं जाणं म्हणजे केवळ एका नटाची एक्झिट नाही; तर एका ताठ कण्याच्या, निडर, स्वाभिमानी अन् प्रचंड हळव्या माणसाचं आपल्यातून निघून जाणं आहे. ज्याने अन्यायाविरुद्ध ताठ मानेने उभं राहायला शिकवलं आणि स्वतःच्या ओंजळीतलं दुसऱ्याच्या पात्रात सांडून माणसं जपायला शिकवलं.
जगण्याच्या रंगमंचावर त्याच्या वाट्याला आलेल्या आणि न आलेल्या सगळ्याच भूमिका वठवून तो निघून गेला.. भाव खाऊन गेला..
'कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी' हे कितीही खरं असलं तरी "यासम हा" हेही तितकंच खरं..
ॐ शांती...
_____________________________________
🖋️ प्रशांत
८ ऑक्टोबर २०२६
Comments
Post a Comment