जिवाशिवाची भेट









⦿ शंभू शंकराच्या जटांसारख्या काळ्याकभिन्न कातळाला भेदत येणारा पांढराशुभ्र जलप्रपात..

त्याचा धीरगंभीर आवाज दरी मधून घुमत येतोय.. धिंधिधिम्.. धिंधिधिम्..
निसर्गाने मुक्त हाताने दान दिलेलं पावसाचं पाणी.. कसल्याश्या ओढीनं स्वतःला खाली झोकून देतं.. दरीतला रानवारा ते अंगावर घेतो आणि पुन्हा वर उधळून देतो.. हजारो थेंब विखुरतात.. काही वरवर जाऊन पुन्हा पाऊस होऊ पाहतात.. काही ऊन्हं पिऊन इंद्रधनुची सप्तरंगी कमान फुलवतात..
पावसाचं गाणं पोटात घेऊन नदी खाली खाली वाहत जाते.. कितीतरी गावं कुशीत घेत.. शेतं फुलवत.. गाणी रुजवत..
कितीतरी वर्ष हे असंच चालत आलं आहे..
एव्हाना पाण्याला आपला रस्ता पाठ झाला असेल.. जुन्या आठवांनी त्यालाही nostalgic वाटत असेल.. तरीच सांगत राहतं पाणी आपल्याला जुन्या गोष्टी.. मेघांच्या गडगडाटातून.. ओढ्यांच्या खळखळाटातून..



आपण पाण्यात पाय टाकून बसतो.. अनिमिष नजरेने समोरचं गिरीवैभव पाहतो.. सह्याद्रीची रांग..
ताठ मानेने उभे असलेले धारदार कडे.. अभिमानी!
आभाळाला तोलून धरलेले.. बुलंद!!
शंभू महादेवाच्या घराशी नातं सांगणारे.. उंच!!!

कधीकाळी याच सह्याद्रीच्या साथीने एका शिवाने मनामनात अंगार फुलवला.. इथल्या दगड धोंड्यात ही स्वातंत्र्याचे मंत्र फुंकले.. ताठ कण्यानं जगायला शिकवलं..

तो शिव आणि हा शिवा..
हिमालयाची उंच उंच शिखरे आणि सह्याद्रीच्या आणि निबीड दुर्गम घाट वाटा..
आदियोगी आणि श्रीमंतयोगी..
हर हर शंभू चा जयघोष आणि हर हर महादेव ची गर्जना..
एक अदृश्य धागा दोघांना जोडणारा दिसू लागतो..
वाटतं.. उंचावरून झोकून देणारा हा धबधबा आपल्या धो धो आवाजात हेच सांगत राहिला आहे..
हर हर महादेव गर्जत राहिला आहे..
आजही त्या गर्जनेने दऱ्याखोऱ्या शहारतात..
आभाळ गहिवरून येतं..
रितं होत जातं..

जीवा शिवाची भेट याहून वेगळी काय असते!

हे शिवा..
तू आहेस..

अविचल सह्यगिरीच्या सावलीत..
लहान थोरांना जपणाऱ्या माऊलीत!
खळाळत्या नदीच्या पाण्यात..
स्वच्छंद पाखरांच्या गाण्यात!
रोरावत्या जलप्रपाताच्या नादात..
भिरभिरनाऱ्या वाऱ्याच्या तालात!
व्यापून उरलेल्या अंबरात..
अन् मनामनातल्या मंदिरात!

तू आहेस..

..आणि तू आहेस म्हणून आम्ही आहोत..

© प्रशांत




Comments