๏ भीमाशंकरच्या कितीतरी घाटवाटा.. हिवाळ्यात सोनसळी साज मिरवणाऱ्या, ग्रीष्माच्या जीवघेण्या उन्हातही गर्द राईची सावली धरून राहिलेल्या .. आणि पावसाळ्यात खळाळत वाहणाऱ्या झऱ्यांशी एकरूप होणाऱ्या ..
सिद्धगडावर जाताना मान उंचावून पहावा लागणारा भलामोठा दमदम्याचा डोंगर, गोरखगडावर जाताना एका वळणावर अचानक पुढ्यात ठाकणारा, आभाळाला टेकू दिल्यासारखा दिसणारा साखरमाचीचा डोंगर.. अाणि या सर्वामुळे त्या डोंगररांगेनं मनावर केलेलं गारूड ..
सरत्या श्रावणाचे पोपटी दिवस.. रविवारच्या साखरझोपेचा मोह सोडून निघालेले आम्ही आठजण.. काही उत्साहाने, काही नाईलाजाने 😁 .. कल्याण-मुरबाड प्रवास.. जुन्या ऑफिसातल्या जुन्या मित्रांच्या नव्या गोष्टी... नारिवलीपर्यंत दोघांचे जीव मुठीत धरून केलेली tripple seat :P .. तिथून पुढे खोपिवलीपर्यंतची 'हवाई सफर'..
निळ्या आकाशात विखुरलेले, घाटमाथ्यावर टोपी बनून तरंगणारे शुभ्र ढगांचे पुंजके.. सकाळच्या हळदुल्या उन्हात न्हाऊन घेत आपलं रांगडेपण हरवून बसलेली आहुप्याची डोंगररांग..!
खळाळत्या ओढ्यांच्या ओल्या आठवणी.. पावसाच्या आठवांत जणू विरहिणी वसुंधरेच्या अंगावर काटा फुलावा तशी फुललेली भातशेती.. बोरकरांच्या कवितेतला 'वर्ख तृप्तीचा पानोपानी' लेवून आणखीनच गर्द झालेलं रान .. त्या रानात हरवलेली वाट.. वनदेवींसारख्या कुठूनतरी प्रगट होऊन आम्हाला योग्य मार्गाला लावून गोरखगडाकडे निघून जाणाऱ्या कुणी मावशी..
ओढा ओलांडून गेल्यावरही कितीतरी वेळ गुंजत राहणारा त्याचा वाहता नाद.. त्याच्याशी चढाओढ करू पाहणारी पक्ष्यांची साद .. काजळकाळ्या घोटीव कातळावर उगवलेली शुभ्र, गुलाबी, जांभळी रानफुलं.. गवतातून, छोट्या मोठ्या खिंडींतून, चिखलातून, शेवाळलेल्या हिरव्या दगडांवरून उड्या मारत वर चढणारी वाट.. थोडीशी कुरकुर, थोडीशी हुरहुर.. कसल्याशा अनामिक ओढीने पावलं चालत राहतात.. आव्हान देणारा सह्याद्रीच मदतीचा हात देऊन वर ओढत राहतो.. झऱ्यातल्या अमृततुल्य पाण्याची संजीवनी देऊन..!
गोरख-मच्छिंद्रगड आभाळाला हात लावण्याचा प्रयत्न सोडून देऊन खाली बसल्यासारखे दिसतात.. आता शेवटचं वळण, हे चढून गेलो की आभाळाला हात लागणार!
..आणि जादू होते.. आभाळ अजूनच उंच होऊन जाते.. समोरच्या विस्तीर्ण पठारावर दूरवर उभ्या असलेल्या डोंगरांनी त्याला आपल्या खांद्यावर घेतलेलं असतं.. माळावरच्या वाऱ्याची पाठीवर मिळालेली कौतुकाची थाप मिरवत आपण आजूबाजूला फिरु लागतो.. छाती दडपून टाकणाऱ्या दऱ्यांची भव्यता भान हरपून पाहत राहतो.. निसर्गचित्रातल्या मातकट ठिपक्यांसारखे दिसणारे पायथ्याचे खोपिवली गाव.. किती उंच आलो आपण!
पोटात ओरडणारे कावळे आहुप्याच्या वाडीचा रस्ता दाखवतात.. जोत्यांवर बांधलेली घरं, कुडाची, लाकडी काही पक्की विटांची.. वीसतीस उंबऱ्यांची जळकेवाडी ... विठ्ठल रखुमाई च्या मंदिरात पाठ टेकते.. अन्नपूर्णेचा हात फिरतो.. अर्ध्या तासात समोर आलेला वाफाळता भात आणि पिठलं.. सुख सुख म्हणजे आणखी काय असतं?
आपल्याहून कितीतरी श्रीमंत मनांच्या माणसांचा निरोप घेऊन आपण निघतो.. पोपटी हिरवा माळ सोनेरी उन्हात चकाकत असतो.. चढताना कस पाहणारा घाट परतीच्या प्रवासात ओळखीचं हसत राहतो.. त्याचं बोट पकडून एक एक पाऊल उतरत आपली वाटचाल निसर्गचित्रातल्या त्या कौलारू ठिपक्यांकडे होत राहते.. नितळ ओढ्याच्या पाण्याचा तोच प्रवाह लागतो..
आठवतं.. एका कुंद पावसाळी दिवशी याच काठावर उभे असलेले आम्ही.. कड्याकपारींवर फुटणारे दुधाचे घट.. धुंवाधार पाऊस.. पाहता पाहता बदललेला ओढ्याचा रंग.. उकळणाऱ्या चहासारखं वाहणारं मातकट पाणी.. अर्ध्यातून परत फिरावं लागलेल्या पावलांची हूरहूर.. दोनेक वर्षांपूर्वीच्या त्या रौद्र रूपानंतर आताचं हे शांत रूप डोळ्यांत साठतं.. एक आवर्तन पूर्ण होतं..!!
© प्रशांत
१४-१५ सप्टेंबर २०१८.
Comments
Post a Comment