सुट्टीचे दोन दिवस सत्कारणी लावण्यासाठी केलेला अट्टाहास, आदल्या दिवशी 'नाही येत' सांगून सकाळीच अवचित स्टेशनवर उगवलेला मित्र, खुबी फाट्यावर उतरून भरपेट केलेला नाश्ता, धरणाच्या भिंतीवरून साडेचार किलोमीटर पायपीट करत जाताना मध्येच खाली उतरून पाहिलेलं अत्यंत भरजरी असं हेमाडपंथी शिवमंदिर, जुन्या नव्या कॅमेऱ्यांची आठवणींंच्या ओंजळीतून निसटणारे क्षण टिपण्याची धडपड, पोहायला लागतं त्यापेक्षा जास्त प्यायला लागणारं पाणी 😁, जांभूळ, करवंद आणि उंबरांच्या सड्यांनी जांभळेलाल झालेले रस्ते, मोहाचा वास मिसळून त्यांचा निराळाच घमघमणारा रानगंध, तोलारखिंडीतून जाताना कदाचित आम्हाला भिऊन (आणि भिववून 😁) पळत सुटलेलं जनावर, त्याच्याच पुढल्या वळणावर अनपेक्षित पणे समोर आलेलं जंगलच्या राजाचं व्याघ्रशिल्प, गर्द राईतून रणरणत्या उन्हात येऊन कातळटप्पा चढताना मधूनच सुखावणारी गार वाऱ्याची झुळूक, एकामागोमाग एक दडून बसलेल्या सात टेकड्या आणि त्यांच्या माथ्यावरचा भन्नाट वारा, शेवटची चढण पार करताना जमिनीतून उगवत असल्यासारखं वर वर येणारं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर, तिथल्या गणपतीसमोर जोडलेले हात आणि दमूनभागून टेकलेली पाठ, देवळातल्या दगडी टाक्यांतलं निवळशंख पाणी, मावळत्या उन्हात कोकणकड्याकडे धाव घेणाऱ्या पावलांची अधीरता, सायंकाळच्या सोनेरी उन्हात उजळून निघालेलं कोकणकड्याचं रौद्रभीषण सौंदर्य पाहून हरपलेलं भान, त्याच्या धारदार कड्यांवर बिलकुल न थांबता थेट ३००० फूट खाली कोसळणारी नजर...रात्रीच्या जेवणात कच्चे राहिलेले बटाटे 😁😁, तंबूच्या बाहेर येऊन शेकोटीच्या शेजारी बसून केलेल्या गप्पा, 'मन मंदिरा' म्हणून काजवे बोलावण्याचा फसलेला प्रयत्न😂, ढगांची चादर एकाएकी दूर होऊन दिसलेली चांदण्यांनी भरून वाहणारी आकाशगंगा, तुटत्या ताऱ्याला (चुकून मोठ्या आवाजात) मागितलेली secret wish 😁😁, दुसऱ्या दिवशी पहाटे कोकणकड्यावरून दिसलेला स्वर्ग, दरीतल्या ढगांवर दिसलेलं इंद्रवज्र! परतीच्या वाटेवर केदारेश्वराच्या थंडगार पाण्यात उतरून घातलेली प्रदक्षिणा...
...आणि हे सर्व करून पाचनईला उतरल्यावर, पुढच्या गावातून बस पकडण्यासाठी सूर्य डोक्यावर घेऊन केलेली ४० मिनिटांतली ५ किलोमीटरची पायपीट..
आठवणींचे काजवे विझतात, चकाकतात.. रानवाटा खुणावतात..
हरिश्चंद्रगड मनात रुजतो.. नव्या कडेकपाऱ्या धुंडाळत पुन्हापुन्हा येण्याचं आवतण देत राहतो..
© प्रशांत
Comments
Post a Comment