मृगजळ

 वैशाखाचा सांगावा माथ्यावर घेऊन मी चालतो आहे. उजव्या बाजूला अथांग जलाशय. त्यात दूरवर तरंगणारे डोंगर आणि डाव्या बाजूचा तुकड्या-तुकड्यांनी भरलेला शेतजमिनींचा विस्तार यातून नागमोडी वळणं घेत माझा रस्ता उंचावरून जातो आहे. तुकड्या-तुकड्यांचे हिरवेपण जमिनीने शोषून घेतले आहे. आत खोलवर कुठेतरी. तटतटलेल्या भेगांमधून श्वास घेत-सोडत असलेली जमीन कसल्याश्या आशेने तग धरून धापा टाकत राहिली आहे.. कासावीस झालेल्या पाखराच्या चोची सारखी! पलीकडच्या अपार जळवैभवाची तिला इतकी ही जाण नाही.


काटेसावरीचा बहर तश्याही वणव्यात आपल्या लावण्याचा दिमाख ढाळत असलेला.. त्या गुलाबी फुलोऱ्यातून एक कोतवाल पक्षी पलीकडच्या जलधीवर झेपावतो. आकाशाचा तेवढा तुकडा चिवचिवतो. शांतवतो. पुन्हा सण्ण पसरून राहिलेली शांतता. त्या शांततेचाच रणगंभीर आवाज सगळीकडे भरून राहिला आहे. काठोकाठ. ईतका भरलेला की दुसरा कसलाही आवाज त्यावर उमटत नाही. रस्त्यावरचा झाडोरा आपल्याच पावलाशी आपली सावली गोळा करून उभा आहे. बोट लावलं की ठसे उमटावेत अशी मऊ माती रस्त्यावर. दगडाला फुटलेला पाझर गुलाल होऊन पाय गोंजरतो आहे. मागे नजर टाकली की त्या धुळीतल्या पाऊलखुणा दिसतात. नजर जाईपर्यंत..


कितीतरी युगांपासून मी चालतो आहे. या धुळीतून उठलेल्या कितीतरी पिढ्या.. याच धुळीत विलीन झालेल्या आणखी किती पिढ्या.. त्यांच्या पाऊलखुणा दिसतात. वाटेवर.. पाण्यावर.. 'कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी' असे म्हणत भर्तृहरीच्या नीतिशतकातला काळ मला कवेत घेतो आहे.. या चक्रातून त्या चक्रात. त्या चक्राचक्रांचे आणखी एक चक्र. कुठल्या काळाकडे ही वाट नेते आहे ? भूतकाळात ? भविष्यात ? की आणखी कुठे ? पावलांना लय सापडली आहे. कितीतरी युगांमागुन मी थांबतो. रस्ता सोडून डाव्या बाजूला खाली कसल्याश्या ओढीने एक वाट घेऊन जाते.

समोर जास्वंदीच्या कुंपणात कुण्या गंधर्वाचे शापित काव्य जणू दगड होऊन थिजले आहे. नागेश्वर मंदिर. हेमाडपंथी बांधणीचे. लाखो वर्षांपूर्वी गोठलेल्या थंडगार लाव्हारसाला पाठ टेकते.. डोळे मिटतात. 


भिरभिरणारे चक्र थांबते.

काळ मागे जाऊन स्थिरावतो. 


दोन हजार वर्षांपूर्वीचा काळ. आजूबाजूला पसरलेले दंडकारण्य. निबिड.. घनदाट.. एका महावृक्षाच्या दाट सावलीत विखुरलेले उन्हाचे ठिपके.. खळाळत वाहणारी पुष्पावती.. तिचं मूळ शोधत आलेल्या कुणा निर्भय तपस्व्याने आणून ठेवलं इथे हे शिवलिंग.. ओबडधोबड नंदी बसवून ठेवला राखणीला..


चक्र फिरू लागते. थांबते. 


सातवाहनांचा वैभवसंपन्न काळ.. भरभराटीला आलेला व्यापार .. माळशेज घाटातून वर येऊन विसावलेले व्यापाऱ्यांचे तांडे.. बाजारपेठांतून दरवळणारे मसाल्यांचे-अत्तरांचे वास.. सोन्या चांदीचे अलंकार.. हस्तिदंती भेटवस्तू.. मौल्यवान रत्ने.. दागिने घेताना हुज्जत घालणाऱ्या रुपगर्विता, त्यांची मनधरणी करणारे सौदागर.. अडत्यांचे हाकारे-कुकारे, देशोदेशींच्या व्यापाऱ्यांचे वेष, अगम्य भाषा. विस्फारलेल्या नजरेने अपार वैभव पाहणारे परदेशी प्रवासी. शिवमंदिर झंकारते.. पुष्पावती वाहतेच आहे..


काळ पुढे सरकतो.. राष्ट्रकूटांचे साम्राज्य.. शिलाहार राजा झांज.. दक्षिणपथावर अलौकिक सुंदर मंदिरे बांधली जात आहेत.. पुष्पावतीचा काठ गजबजतो.. प्रतिभासंपन्न कारागिर पाषाणात जीव ओतत आहेत.. त्यांच्या छिन्नी हातोड्यांच्या आवाज.. नदीकाठ थरारतो.. मंदिर आकाराला येते.. आभाळाला तोलत वर वर चढत जाते.. ओबडधोबड नंदी पाठीवर भरजरी नक्षीदार झुल मिरवू लागतो.. काळ्याशार पाषाणावर मूर्तिमंत काव्य कोरणाऱ्या त्या अनामिक कलाकारांना काळ आपल्या उदरात घेतो. कला उरते.. त्यांच्या कलेचा तो ठेवा पुढे पुढे येत राहिला आहे.. आपल्यापर्यंत..


.. कुण्या भाविकाने वाजवलेला घंटेचा आवाज ऐकुन मी भानावर येतो.. समोरच्या दिव्य कलाकृतीला पाहून आपसूकच हात जोडले जातात .. जीवा शिवाची गाठ पडते.. ऐटीत मान वळवून बसलेला शेजारचा नंदी ओळखीचं हसतो.. मृगजळाची तहान आभाळभर विरत जाते.. वैशाखाचा निरोप पायरीपाशी ठेऊन मी पुढे चालत राहतो.


© प्रशांत

६-१० नोव्हेंबर २०१९.

Comments