๏ घराजवळून नदी वाहते.. काठाशी उतारावर केलेली शेती आणि बाभळींची दाटी.. त्या पोरसवदा वाटणाऱ्या झाडांमध्ये एक दोन वड.. आपल्या लांब लांब दाढ्या लटकावत प्रचंड पावसाळे पाहिल्याचा गंभीर आव आणून उभे राहिलेले.. तसं ते खरंही आहे म्हणा! पावसाळ्यात रोरावत वाहणारे पुराचे लाल मातकट पाणी त्यांची गळाभेट घेते तेव्हा काठावरच्या दोन्ही गावातून भांबावलेल्या नजरेने लोक पूर पाहत असतात.
आणखीही कितीतरी झाडं. आंबा, पिंपळ, पांगिरा, पळस, काटेसावर, सुबाभूळ.. मध्येच एखाद ठेंगणं ठुसकं माडाचं झाड. एरवी हिरवाईत त्यांचं वेगळेपण हरवून जातं. जसजशी ऋतूंची चाहूल लागते तसतशी एकेकाची दुरूनच ओळख पटू लागते.
वावळा आणि करंज.. एकमेकांच्या सोबतीने वाढणारी दोन झाडं. त्यातला वावळा थोडा पोक्त वाटणारा.. मध्ये सरळसोट उंच वाढून फांद्यांचा विस्तार जपणारा. करंज अड्यानिड्या वयातल्या मुलासारखा.. उंची कमीच पण अस्ताव्यस्त पसरलेला.. पावसाळ्यात अंगावर आलेलं बाळसं दोघांना गडद हिरव्या पानांची झूल देऊन जातं.. पावसाळी मेघ यक्षाचा निरोप घेऊन पांगतात. पितृपक्षातलं झळझळीत निळंशार आकाश, त्याच्या पार्श्वभूमीवर या झाडांच्या आकृत्यांची वळणावळणाची रेष, जमीन आणि आकाशाची सीमारेषा अधोरेखित करत राहते. उंच वावळा आणि शेजारचा करंज त्या रेषेला छेद देऊन जमिनीचं आभाळशी नात जोडू पाहतात. थंडीचा अंमल सुरू होतो. पहाटेच्या दाट धुक्यातून हे दोघे अधिकच दूर गेल्यासारखे दिसतात. त्यांच्या गडद पानांतून थंडी अगदी आत आत शिरते.. हाडांपर्यंत.. गारठलेल्या शिशिराची पानगळ सुरू होते.. करंज आपल्या हडकुळ्या फांद्यानी अगदीच केविलवाणा दिसू लागतो. पर्णसंभार टाकून देऊन वावळा देखील हलका हलका होतो. त्याच्या पिळदार फांद्यांवर मावळत्या सूर्याची किरणे पडली की तो अधिकच देखणा वाटू लागतो. उघड्या बोडक्या त्याच्या फांद्या, पैलवानाच्या पिळदार शरीर प्रमाणे दिसतात, एकेक नस तटतटून फुगलेली. पुढे थंडीचा अंमल सरू लागतो आणि उन्हाळ्याची चाहूल लागते.
रोज सकाळी अंगवळणी पडल्याप्रमाणे गॅलरीत आलो की निष्पर्ण झालेली ही तीन चार झाडं दिसायची. ग्रेस च्या कवितेतली 'निष्पर्ण तरुंची राई' हीच हे मी माझ्यापुरतं तरी ठरवून टाकलेलं.
एका दिवशी अचानक नवल घडलं. वावळ्याच्या सर्वांगावर पोपटी कवच कुंडलं दिसू लागली. इवल्या इवल्या पापड्यांनी सर्व झाड भरून गेलेलं. आदल्या दिवशीचा निष्पर्ण वावळा अंगभर पोपटी नवलाई मिरवत दिमाखात उभा होता. सकाळच्या उन्हात डोक्यावर पाचूंचा मुकुट चमकू लागला. त्याच्या त्या अद्वितीय सौष्ठवापुढे शेजारचा करंज अधिकच केविलवाणा वाटू लागला. निष्पर्ण..
एकमेकांच्या सोबतीने राहिलेल्या दोन झाडांच्या भाग्यात इतकं अंतर असावं? तीच हवा, तेच पाणी आणि तीच जमीन दोघांनाही रुजवत होती. वाढवत होती. मग एक असा प्रासादी वैभवाच्या शिखरावर असताना दुसऱ्याच्या उत्कर्षाचा एवढाही मागमूस नसावा?
हळू हळू वावळ्याने डोक्यावरचा तो पाचूंचा मुकुट कुठेतरी लपवून टाकला. त्याच्या पोपटी पापड्यांनी सायंकाळच्या उन्हाचा सोनेरी रंग घेतला. आणि काही दिवसांतच त्या नाजूक पोपटी रंगाच्या जागी सोनेरी पापड्या किणकिणू लागल्या. प्रत्येक पापडीने आपल्यासोबत एक बीज घेतलं. ते घेऊन काही पापड्या आपल्या गोलाकार पंखांनी वाऱ्यावर दूर उडत जाऊ लागल्या. काही मध्येच पाण्यावर उतरल्या. उडत्या बगळ्यांच्या प्रतिबिंबांसोबत वल्हे मारत प्रवासाला निघाल्या. वावळा पुन्हा उघडा बोडका पडू लागला.
..आणि अचानक एके दिवशी वावळ्याने आपला कुठेतरी लपवून ठेवलेल्या पाचूचा मुकुट करंजाला बहाल केला. कोवळ्या पोपटी पालवीने करंज मोहरुन गेला होता. वावळ्याचा उत्सव संपला.. आता करंजाचा उत्कर्ष सुरू झाला होता..
कसं जमतं असं झाडांना? आपल्यातूनच आतून फुलून येणं आणि सर्व उधळून देऊन पुन्हा स्थितप्रज्ञासारखं उभं राहणं..
वसंत आता कुठे सुरू झालाय. यथावकाश वावळ्यालाही पालवी फुटेल. निष्पर्ण तरूंची राई पुसट होत जाऊन हिरवेपण लेऊन त्यात दडून राहील. पुढचे कित्येक दिवस.
हजारो वर्षांपासून हे घडत आलेलं आहे.. पुनः पुन्हा घडणार आहे. चढ-उतार, उत्कर्ष-ऱ्हास यांची मालिका सुरू राहणार आहे. प्रत्येकाची वेळ ठरलेली. लवकर उत्कर्ष झाला म्हणून तो सहजसाध्य आहे असे नाही. किंवा प्रयत्न करूनही यश मिळाले नाही म्हणजे ते असाध्य आहे असेही नाही. उत्कर्षाच्या शिखरावर असताना खालच्याला हात द्यावा आणि अपयशाने खाली जरी पडलो असलो तरी प्रयत्नवादी राहावे इतकं कळलं तरी पुरेसं आहे.
उत्पत्ती, स्थिती आणि लय या जरी जीवनाच्या अवस्था एकसुरी वाटत असल्या तरी जीवन हे एखाद्या वाहत्या नदीसारखं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तर केवळ तिच्या काठावरची ठिकाणं आहेत.. प्रवाहाला दिशा देणारी.
...आणि हे काठ आहेत म्हणून नदीच्या वाहण्यालाही अर्थ आहे.
© प्रशांत
२७ मार्च २०२०
Comments
Post a Comment