⦿ Tolkien च्या जादुई दुनियेतल्या ठेंगू माणसांच्या गावातून खळाळत चालल्यासारखे दिसणारे चहाळ पाण्याचे ओघ.. त्यांना वेढून राहिलेले हिरवे - निळसर अंगाचे डोंगर.. आभाळाचा सावळा गडगडाट.. त्यात गुडूप झालेले माथे.. त्यावरचं रान..
जिकडे तिकडे रुजून राहिलेलं पावसाचं हळवेपण .. शेतांची , रानांची हिरवी मखमल.. त्या मखमलीच्या लाटांवर लाटा... तिला किनारे असल्यासारखे बांध.. डोळ्यांना जाणवणारं मऊ पण.. डोळ्यांतून अंगभर भिनत जातं पावसाचं हळवेपण.. ढगांच्या ओळी खाली येतात.. उभ्या आडव्या बोटांनी टेकड्यांवरून हात फिरवत पुन्हा वर वर जात राहतात.. मेघांच्या झिरझिरीत पडद्यामागून दिसणारी , तिरक्या डोंगर उतारावर उभी राहून खालच्या भयाण दरीत वाकलेली झाडांची रांग.. मध्येच दिसणारी, मध्येच लपणारी खोल दरी.. 'ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई'..
धुकेरी पडद्या मागे उंचावलेले कितीतरी सुळके.. त्या अनगड सुळक्यांना ढुशा मारणारे ढग..
दूरवर आलेले रस्ते.. सळसळत डोंगर चढणारे.. त्यावरून संथपणे फिरणारे शेळ्यांचे कळप.. भिजून नोकदार झालेले त्यांचे झिपरे केस.. पावसाने भेट दिलेलं वेल्हाळपण जपणारं काजळ भरल्या डोळ्यांचं.. एखादं करडू आपल्याच धुंदीत..
उंचावरून खाली पाहताना कॅनव्हास गच्च भरलेला.. हिरव्या रंगाच्या अगणित छटांवर कुठे कुठे साचलेल्या पाण्याचे बिलोरी तुकडे.. काही नितळ.. काही मातकट.. कुठे कौलांचे लाल, कुठे सिमेंटचे शुभ्र पांढरे.. शिस पेन्सिलने ओढलेल्या रेघांसारख्या विजेच्या तारा..
दूर डोंगराच्या पाठीवरून कोसळणारे धबधबे, एका लयीत खाली येणाऱ्या पांढऱ्याशुभ्र रेषा.. जोरदार वाऱ्याने पुसल्या जाणाऱ्या.. पुन्हा सरळ होणाऱ्या..
इतक्या दूरवरून येणारा त्यांचा घनगंभीर आवाज सर्व व्यापून राहिलेला.. त्या नादाची चौकट या निसर्ग चित्राभोवती आखत जाते..
कितीतरी पाऊसवेळा.. कविता सजीव करणाऱ्या..
वाऱ्यावर विरणाऱ्या.. मेघांसोबत बरसणाऱ्या..
काही भिजणाऱ्या.. काही रुजणाऱ्या..
काही सरणाऱ्या.. काही उरणाऱ्या..
© प्रशांत
Comments
Post a Comment