๏ कल्याण आणि जुन्नर या प्राचीन शहरांना जोडणारा माळशेज घाट सर्वांना माहीत असतो. सातवाहनकालीन व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट ही बऱ्याच जणांना माहीत असतो. एकूणच ह्या भागात कोकण आणि घाटमाथा यांना जोडणाऱ्या घाटवाटांची रेलचेलच आहे. पण माळशेज घाटातच असलेला जुना व्यापारी मार्ग (जो फारसा प्रचलित नाही) बऱ्याच जणांना माहीत नसतो. पायथ्याच्या थितबी गावापासून सुरू होणारा हा घाट डोंगरमाथ्यावर जिथे सध्या एमटीडीसीचा रिसॉर्ट आहे तिथे संपतो. खूप दिवसांपासून ही घाटवाट करायचं मनात होतं आणि शेवटी योग आला तो गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये.
.
एमटीडीसीला उतरून आम्ही वाट शोधायला लागलो. थोड्याच वेळात वाट सापडली, सुरुवातीचा उतार आणि झाडाझुडुपांची दाटी पाहता याला व्यापारी मार्ग म्हणावं का असा प्रश्न पडला, पण थोड्याच वेळात नाणेघाटात आहेत तशाच दगडी बांधणीच्या पायऱ्या दिसू लागल्या. त्यांची पडझड पाहता नाणेघाट बराच चांगल्या स्थितीत आहे. माळशेज घाटातील रहदारीचे आवाज विरत गेले आणि घनदाट रानात शिरत गेलो. यावर्षी पाऊस चांगलाच लांबलेला. जंगल अजूनही हिरवंगार.. शरदाने चौफेर रानफुलं उधळलेली.. एक मध्यम आकाराचा धबधबा लागला. खळाळत वाहणारं पाणी.. उजवीकडच्या डोंगराला चिटकून पुढे जाणारी वाट.. धबधब्यात भला मोठा दगड येऊन पडलेला.. समोर हरिश्चंद्रगड दिसतो.. कसलीच घाई नसल्यामुळे तासभर इथेच रमलो.
उजव्या बाजूने पुढे निघालो. डावीकडे वर उंचावर घाटातली वर्दळ दिसू लागली.. आणखी थोडं पुढे आलो आणि..
.
उजव्या अंगाला कातळावर कोरलेली गणेशमूर्ती.. महिरपी कोनाडा.. त्यावर नक्षी.. सर्वांगावर शेंदूर.. कधीपासून असेल इथे हा? हा घाट खोदला तेव्हापासून की त्याही आधीपासून? घाट बांधणाऱ्या कारागिरांचे श्रम त्याने पाहिले असतील.. त्यांना आशीर्वाद देऊन तो स्वतःच सुखावला असेल.. सातवाहनांचा अपार वैभवाचा काळ पाहिला असेल.. वाटसरू, प्रवाशांची ये जा.. व्यापाऱ्यांची वर्दळ.. सुबक बांधणीचं देऊळ असेल.. घट चढून येणारे पांथस्थ, देवळाचा कळस पाहून घाट संपत आला या विचाराने सुखावले असतील.. प्रवासाने दमले भागलेले जीव त्याच्या पारावर घटकाभर विसावले असतील.. प्रवास सुखरून होऊदे म्हणून त्याच्यापुढे नतमस्तक झाले असतील.. काळ पुढे सरकला.. समोरच्या डोंगरातून नवीन रस्ता झाला.. जुना मागे पडला.. वर्दळ कमी होत गेली.. काळाच्या ओघात देऊळ, ओसरी, कळस पुसट होत होत विरून गेले.. स्थळकाळाच्या पलीकडे असलेला तो मात्र अजूनही इथंच आहे.. बदलत्या काळाचा महिमा पाहत राहिला आहे.. विरक्तीचा शेंदूर अंगाला लावून.. येणाऱ्या जाणाऱ्याला वाट दाखवत.. तथास्तु म्हणत..!
.
๏ प्रशांत ๏
Comments
Post a Comment