दुर्गम गणेश ३

 

๏ भीमाशंकर अभयारण्याचा वायव्य भागात असलेले गोरखगड, मच्छिंद्रगड त्यांच्या वैशिष्टय पूर्ण आकारामुळे  दुरूनही ओळखू येतात. त्यांचा मोठा भाऊ शोभावा असा सिद्धगडही ह्याच रांगेत ताठ मानेने उभा आहे. सिद्धगडाची माची एका बाजूने विस्तृत असल्यामुळे तिथे तुरळक मनुष्यवस्तीही आहे. गोरखगडाहून सिद्धगडकडे जाणारी वाट आहे. तशाच पायथ्याच्या गावातून सिद्धगडावर जाणाऱ्या दोन तीन वाटा आहेत. आम्ही नारीवलीहून निघालो.

गावाबाहेरच्या शेतांतून मार्ग काढून आपण मुख्य पायवाटेला लागतो. गुरांच्या चराईला जाण्या येण्याच्या ह्याच वाटा असल्याने वाटेची छान मशागत होऊन मऊ धूळ जमलेली. वाटेत एक ओढा लागतो. बारीक प्रवाह. नितळ पाणी. त्यावरचा पूल ओलांडून वाट अभयारण्यात शिरते. दुतर्फा गच्च रान. पाखरांचे आवाज. पावलांची लय रानात भिनत जाते. सिद्धगड आणि त्याच्या बाजूचा डोंगर या दोघांच्या मधल्या नाळेतून आपण वर वर जात राहतो. अभयारण्यच ते. उंचच उंच वृक्ष. त्यांच्या पानांमधून झिरपणारे सूर्य प्रकाशाचे कवडसे. त्यातून गाळून खाली येणारा मऊ प्रकाश ! अश्या गूढ वातावरणातच सिद्धगडाचं प्रवेशद्वार अगदी अनपेक्षितपणे समोर येतं. त्यातून पुढे गेल्यावर एक वाट सरळ माचीवरील सिद्धगडवाडीकडे जाते तर दुसरी जरा उलटे वळण घेत एका मंदिरापाशी येऊन पोचते. अगदी जवळ येईपर्यंत इथे काही असेल असं मुळीच वाटत नाही. 

जांभ्या-लाल दगडाच्या बांधणीचं उतरत्या छपरांचं देऊळ. समोरच्या बाजूला छोटीशी दीपमाळ, काही वीरगळ.. उंचच उंच झाडांनी वेढलेलं असूनही पडलेला पाचोळा सगळा झाडून लख्ख केलेलं अंगण.. बाहेर प्रशस्त ओवरी.. नक्षीदार लाकडी प्रवेशद्वार.. आत गूढ प्रकाश.. इतक्या निबीड रानात एखादं रान फूल उगवावं अन् चिवटपणे रुजावं तसं रुजलेलं देऊळ. जंगलातल्या शांततेने आपला निवारा बांधला तर तो असाच असेल असं वाटावं. मंदिरात जुन्या नव्या देवांच्या मूर्ती. मुख्य देऊळ देवीचं. बाहेर उजव्या बाजूला प्रशस्त अंगण. त्यात एके ठिकाणी असलेली शंकराची पिंड आणि गणपती. मंदिर सोडून बाप्पांनी बाहेर उघड्यावरच ठाण मांडलेली. कुण्या भाविकाने घातलेला हार गळ्यात तसाच. प्रसादाच्या खोबऱ्याचे तुकडे विखुरलेले.. ते पळवणाऱ्या खारींची लगबग.. मनोभावे हात जोडले आणि पुढे निघालो. सिद्धगडाचा खरा थरार अजुन या पुढेच अनुभवास आला. पण त्या शांततेच्या निवाऱ्यात घालवलेले निवांत क्षण पुढे कित्येक दिवस सोबत करत राहिले.

.

๏ प्रशांत ๏

#trekkingsahyadri #trekdiaries #momentsilived #ganeshotsav2020 #siddhagad #bhimashankar

Comments