दुर्गम गणेश ५

 ๏ हरिश्चंद्रगड.. भटक्यांची पंढरी..! या नावाचं एक गारूड.. त्याचा नजरेत न मावणारा अवाढव्य विस्तार.. त्याकडे जाणाऱ्या कितीतरी वाटा.. आपण त्यातलाच एक धोपट मार्ग निवडतो.. सरत्या उन्हाळ्याचे दिवस.. शुष्क रखरखाट मागे टाकत आपण गर्द रानाची वाट धरतो.. लुकलुकणारे कवडसे रांगोळीचे ठिपके बनून वाटेवर सांडत राहतात.. एकेक वळण मागे टाकत ‘पाऊले चालती' राहतात. ही आगळ्यावेगळ्या ‘पंढरीची वाट'..! वर विरळ सोनेरी गवत.. ग्रीष्माची धग जाणवते.. जीवाची तगमग दूर व्हावी म्हणून वारा फेर धरून गाणी गात राहतो.. सहा-सात टेकड्या ओलांडून वाट थांबते. खडकाळ भूमीवरच उगवून आलेलं नक्षीदार कौतुक आपल्याकडे पाहत उभं असतं.. हरिश्चंद्रेश्वराचं देऊळ..

एखादी मयसभा अवतरावी तसा वातावरणाचा नूर पालटून जातो.. आकाशाच्या अथांग निळाईत भगव्या रंगाची एक छटा उमटते.. बरसणाऱ्या रुक्ष उन्हाचा भर ओसरतो.. दिवसभरच्या अग्नीवर्षेत तापलेला भवताल शांतवतो. मावळतीचे कोवळे ऊन माळावर रांगत येते.. करड्या दगडी मंदिराच्या कळसाला सोन्याची झिलई चढवते. महादेवाचं दर्शन घेऊन पावलं बाहेरच्या बाजूला वळतात.. ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा' बाहेरच्या बाजूने विराजमान झालेला.. जीवाशिवाची गाठ पडते.. मंदिरा बाहेरच्या रिक्त अवकाशालाही एक भरलेपण येतं. थांबलेली पाऊले.. जोडलेले हात.. टेकलेला माथा.. श्रांत देह.. क्लांत मन.. अनिमिष नेत्रांनी आपण गणरायाचं रुप पाहत राहतो.. कोकणकडा साद घालत असतो.. पावलं अधीर.. पण तरीही रेंगाळतात.. देवळाच्या नक्षीदार दगडांमध्ये हजारो वर्षांपासून वाहत असलेलं काव्य आपल्या आत उलगडत जातं.. डोळे मिटून आपण हे सारं आपल्यात सामावून घेऊ पाहतो.. काही निसटतं.. काही रुजतं.. भरभरून देणारा तो.. आपलीच ओंजळ अपुरी पडते.. मिळेल तितकं दान घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघतो.. पुन्हा येण्यासाठी!

एक प्रवास संपतो दुसरा सुरू होतो.. विसर्जनाकडून सर्जनाकडे.. सृजनाकडे..!

.

๏ प्रशांत ๏ 

Comments