दुर्गम गणेश ४

 

๏ आपल्या अद्भुत आणि अद्वितीय शिल्पकलेने जगाला मोहिनी घालणारी अजिंठा लेणी. अजिंठ्याची डोंगररांग  असेच एक नवल पोटात बाळगून आहे. रूद्रेश्वर लेणी. अजिंठ्यापासून थेट रस्ता नाही. सोयगावहून वेताळवाडी पर्यंत एक रस्ता जातो. तिथून पुढे फक्त कच्चा रस्ता. वेताळवाडीच्या किल्ल्यापासून डाव्या बाजूला वळलं की तासाभराची पायपीट आणि थोडीफार चढ-उतर करून आपण या लेणींपर्यंत येऊन पोहचतो. येताबरोबर नजरेत भरतो तो दोन टप्प्यांत खाली येणारा धबधबा. याचा दुसरा टप्पा म्हणजे एक प्रकारची घसरगुंडीच आहे. खाली त्याचा डोह आणि डोहाच्या काठाने कोरलेल्या अनेक गुंफा. डोहावर तरंगणाऱ्या..!

त्यातल्या एका बाहेरच्या बाजूला असेलल्या गुंफेला पायऱ्या. त्या चढून दारातून वाकून आपण आत प्रवेश करतो. आतली गुफा चांगलीच लांब रुंद अन् उंच. आता गार काळोख भरुन राहिलेला. पायांना स्पर्श करणारा गारवा अंगभर पसरत जातो. गुहेची उंची वाढल्याच जाणवताच आपण सरळ उभे राहतो. गुहेटल्या अंधाराला डोळे सरावत असतानाच अंधारातून प्रगट झाल्यासारखा दिसतो पाय दुमडून बसलेला मोठ्ठा गणपती. बसलेला असूनही आपणाहून उंच..! बाहेरच्या प्रवाहाचा धीरगंभीर नाद सभामंडपात उमटतो.. त्यातला गूढ अंधार सवयीचा होतो. मंडप उजळतो. गणेशाच्या आजूबाजूला नरसिंह आणि नटराज यांच्या मूर्ती कोरलेल्या. गुहेत आणखीही काही कोनाडे कोरलेले, त्यात पूर्वी मूर्ती असाव्यात. डाव्या बाजूला लागूनच आणखी एक गुहा पण कमी उंचीची. पायऱ्या चढून त्यात वाकून शिरावे. इथे मोठ्या आकाराचे शिवलिंग.. त्यासमोर ऐटीत मान वळवून बसलेला नंदी.. हाच तो रुद्रेश्वर! या गुहेतून पायऱ्या सरळ बाजूच्या डोहात उतरतात. महादेवाच्या अभिषेकासाठी ही सोय असावी. सोबत आलेल्यांपैकी कुणीतरी ॐ काराचा उच्चार करतो. लेणे झंकारते.. लेण्यात कसलातरी गंध भरून राहिलेला.. नाद, रंग, गंध, स्पर्श या संवेदनांच्या पलीकडचं काहीतरी जाणवतं.. एखादाच क्षण! पुन्हा पहिल्या गुहेत येत गणरायाला वंदन करत आपण बाहेर पडतो. बाहेरच्या झगझगीत उजेडाने डोळे दिपतात. अश्या अनगड जागी बाप्पाची भेट झाल्याचा आनंद तिथल्या डोहाच्या पाण्यावर तरंगत राहतो.

.

๏ प्रशांत ๏

trekkingsahyadri #trekdiaries #momentsilived #ganeshotsav2020 #rudreshwar #ajintha

Comments