दुर्गम गणेश १

 


๏ सह्याद्रीच्या डोंगररांगांत फिरताना अनघड अन् दुर्गम जागी शिव, गणेश, हनुमान, काळभैरव अश्या कित्येक दैवतांच्या मूर्ती आणि शिल्पं आढळतात. अनादि काळापासून हे देव भाविकांच्या, पांथस्थांच्या श्रद्धेचा भाग राहिले असतील. काही अजूनही आहेत. कित्येक किल्ल्यांवर पहिला लागतो तो गणेश दरवाजा आणि त्यावर कोरलेली गणेश पट्टी. त्याखेरीज घाटवाटांमध्येही गणेशाची अनेक शिल्पं, मंदिरं आढळतात. लौकिकार्थाने जरी ही मंदिरं म्हणून प्रसिद्ध नसली तरी डोंगरदऱ्यात भटकंती करणाऱ्यांना हे गणपती बाप्पा दिसले की एक अनामिक आनंद होतो. काही तरी गवसल्याचा.

.

सिंदोळा! माझा पहिला सोलो ट्रेक. माळशेज घाट चढून वर गेल्यावर लागणारा एक छोटासा किल्ला. ट्रेकर्सची फारशी वर्दळ नसलेला. सुरवातीची चांगलीच ठळक असलेली वाट नंतर माळरानावर घेऊन गेली आणि समोरच आहे म्हणता म्हणता पायाखालून कधी झाडाझुडुपात गडप झाली कळलेही नाही. महत्प्रयासाने वाट शोधून योग्य मार्गाला लागलो. मुख्य डोंगराला डाव्या बाजूने वळसा घालून जाणारी वाट. झाडोरा नाहीच. उंच, वाळलेलं गवत. वाट पायाखालचीच असली तरी गेल्या कित्येक दिवसात या वाटेनं कुणी गेलेलं नाही असंच वाटत होतं. हिवाळ्यातली असली तरी दुपार ती दुपारच. टळटळीत! उन्हाचा भारा डोक्यावर घेत एकदाचा वळसा घालणारा टप्पा पार केला आणि शेवटची घळ चढू लागलो. चांगलीच दमछाक झाली. धापा टाकत वर चढता चढता अर्धवट बांधलेल्या पुरातन दरवाज्याचे अवशेष दिसले आणि थांबलो. समोरच्या कातळावर कुणा भाविकाने कोरलेली गणेश प्रतिमा! वर आभाळाचं छप्पर. घळीतून भरारा येणारा वारा अंगावर घेत गणपतीबाप्पा बसलेले. 'सिंदुरचर्चित ढवळे अंग' मधला शेंदूर पार विरून जाऊन 'ढवळे अंग' तेवढे दिसत होते. सकाळपासूनच ट्रेकमध्ये दिसला होता तो फक्त आणि फक्त निसर्ग. त्या निसर्गाचा स्वामी असा अचानक समोर पाहून आलेला थकवा कुठल्याकुठे निघून गेला आणि नकळतच हात जोडले गेले. बाजूच्या वाटेने थोडा वर येऊन थांबलो. भन्नाट वारा.. त्यावर डोलणारी पिवळ्या रंगाची फुलं.. माझ्या 'गणपती बाप्पा..' च्या हाकेला उत्तर म्हणून त्या रानवाऱ्याने 'मोरया'ची साद दिली आणि मी गडमाथा फिरायला पुढे निघालो.

©प्रशांत

#trekkingsahyadri #trekdiaries #momentsilived #ganeshotsav2020 #sindola #malshejghat

Comments