पावनखिंडीतील अद्वितीय समरप्रसंग घडत असतानाच पुण्याजवळ चाकणच्या भुईकोटला शाहिस्तेखान विळखा घालून बसला होता (जुलै १६६०). दक्षिणेला आदिलशाही व उत्तरेला मुघल यांच्या कैचीत सापडलेल्या स्वराज्याला किंचित स्थिरता लाभावी म्हणून महाराजांनी पन्हाळगड जौहर’च्या ताब्यात द्यायचा निरोप देऊन आदिलशहाशी मैत्री करार करून टाकला. आता त्यांनी आपला मोर्चा वळवला शाहिस्तेखान या मोठ्या शत्रू कडे. आदिलशहाचा परिंडा नावाचा २६ तोफा असलेला बुलंद किल्ला युद्ध न करताच काबीज करणाऱ्या कर्तलबखान नावाच्या सरदाराला खानाने उत्तर कोकणाच्या मोहिमेवर धाडला. औरंगजेबाच्या बाजूने तो दारा शिकोह्च्या बाजूने आलेल्या जसवंतसिंहांशी देखील लढला होता. २०००० चे सैन्य घेऊन खान निघाला.(जानेवारी १६६१) महाराजांच्या चतुर हेरांकडून त्याच्या सर्व खबरी त्यांना मिळत होत्याच. बोरघाटातून एवढ्या सैन्यानिशी येणाऱ्या शत्रूचा मुकाबला करणे सामरिकदृष्ट्या कठीण म्हणूनच अव्यवहार्य होते. शिवाजी महाराज रायगडाहून वाघजाई घाटाने उतरून कोकणातील उंबरे गावाजवळ येऊन थांबले. शिवाजी पेण जवळ आहे अशी बातमी मिळताच अपेक्षेप्रमाणे खान बोरघाटाचा रस्ता सोडून कुरवंड्याच्या घाटाने येता झाला. तत्पूर्वी आपण बोरघाटातून येणार असल्याच्या अफवा त्याने पसरवल्या व लोणावळ्यापर्यंतचा प्रवासही त्याने तसाच केला. शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर सोबत सैन्याची एक तुकडी बोरघाटात कोरीगड जवळच्या जंगलात पाठवली होती. लोहगड विसापूर या किल्ल्यांवरूनही मराठ्यांनी काही प्रतिकार केला नाही त्यामुळे आपला बेत शिवाजीला कळलेला नाही हे मनोमन समजून खान खुश झाला. तसाच तो कुरवंडे गावाजवळ च्या घाटमाथ्यावर येऊन पोचला (१ फेब्रुवारी १६६०). दुसऱ्या दिवशी हा घाट उतरता उतरता त्याच्या नाकी नऊ आले. तीव्र उतारावरून वाहताना कित्येक तोफा, रसद असलेल्या गाड्या, बैलगाडीसकट खालच्या पाताळासारख्या दिसणाऱ्या दरीत गडगडल्या. त्यात घनदाट अरण्य पाहून त्याच्या सैन्याची पाचावर धारण बसली. महाराजांनी अगोदरच या जंगलात १००० मावळे अशा खुबीने पेरून ठेवले होते की त्यांच्या संख्येचा नेमका अंदाज येऊ नये. रानातून मराठे तुकड्या-तुकड्यांनी येत व अचानक हल्ला करून कापाकापी करून बाजूच्या घनदाट जंगलात नाहीसे होत. खानच्या सैन्याला त्यांनी पुरते जेरीस आणले. त्याची ३५० माणसे मेली. शिवाय मनोधैर्य खचले ते वेगळेच. अजूनही मराठ्यांच्या सैन्याचा नेमका अंदाज येईना. परत फिरावे तर नेताजी पालकरने मार्ग बंद केलेला. खान अगदी घायकुतीला आला. शेवटी सोबत असलेल्या रायबाघन या राजपूत सरदारनीच्या सल्ल्यावरून त्याने शरणागती पत्करली व पुण्यास सुखरूप परत जाऊ द्यावे अशी विनंती केली. महाराजांनी त्याच्या सैन्याची सर्व रसद, दारूगोळा, शस्त्रास्त्रे व अंगावरचे जड-जवाहीर यांच्या बदल्यात ही मागणी मान्य केली व खानाला त्याच्या सैन्यासकट नेसत्या वस्त्रानिशी परतण्याची मुभा दिली. सैन्याचे अगदी व्यस्त प्रमाण असताना केवळ सक्षम हेरखाते व आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीचा केलेला वापर याच्या जोरावर जिंकलेली अशी लढाई क्वचितच झाली असेल.
संदर्भ:
वेध महामानवाचा- डॉ. श्रीनिवास दा सामंत उंबरखिंड समरभूमी स्मारक – संतोष जाधव यांचा ब्लॉग
यात्रा एका समरभूमीची-रिचार्ज-लाइफस्टाइल-Maharashtra Times मधील लेख
परांडय़ाचे दुर्गवैभव – लोकसत्ता तील लेख http://www.loksatta.com/trekit-news/paranda-fort-1080717/
विएतनाम मधील दिएन बिएन फू आणि स्वित्झर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्यातील मोर्गार्तन चा पहिला विजय ही काही तुरळक उदाहरणे.
Comments
Post a Comment